आमदार अभिजित वंजारी यांनी केली नुकसानभरपाईची मागणी
मुंबई/ नागपूर | प्रतिनिधी मुंबई येथे सुरु असलेल्या 2025 च्या पावसाळी अधिवेशनात नागपूर व परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुद्दा विधानसभेत आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला. या पावसामुळे नागपूर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांच्या मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. नागपूर शहरामध्ये मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला. नागपूर शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. शहरातील सर्व नाले भरून वाहत आहेत. मनीष नगरसह अन्य भागातील सर्व अंडरपासेस पाण्याने भरून वाहतूक ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाने परिपत्रक जारी करून नागपूर शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे पाऊल योग्य असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, असे मत आमदार अभिजीत वंजारी यांनी व्यक्त केले. तथापि, अजूनही शहरात पावसाचा जोर कायम आहे. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये, तसेच सिमेंटच्या रस्त्यांमुळे अडवल्या गेलेल्या वस्त्यांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले असून, त्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संदर्भात आमदार वंजारी यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, ज्या नागरिकांचे घरात पाणी घुसल्यामुळे नुकसान झाले आहे, अशा सर्व प्रभावित लोकांचे तातडीने पंचनामे करून त्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी. नागपूरच्या रामनगर परिसरातील हिल रोड ते पांढराबोडीकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला असून, सकाळी कामावर, शाळेत जाणाऱ्या नागपूरकरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. हवामान विभागाने आज नागपूरसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून, अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मानकापूर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीजवळील रहिवासी भागात पहाटे तीनच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. जवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरले असून, काही घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे घरगुती साहित्याचे नुकसान झाले असून, नागरिकांनी तातडीची मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.