आमदार अभिजित वंजारी यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई/नागपूर : मुंबई येथे सुरु असलेल्या 2025 च्या पावसाळी अधिवेशनात नागपूरचे आमदार अभिजित वंजारी यांनी नागद्वार पचमढी यात्रेकरूंसाठी एसटी महामंडळाच्या बसेसच्या परवानगीचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. लाखो नागपूरकर भाविक दरवर्षी मध्य प्रदेशातील पचमढी येथील नागद्वार यात्रेत सहभागी होतात. मात्र या यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या बसेसना मध्य प्रदेश सरकारकडून परवानगी मिळण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधत सांगितले.
आमदार वंजारी म्हणाले, पचमढी नागद्वार यात्रेत दरवर्षी नागपूर व विदर्भातून मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होतात. या भाविकांसाठी एसटी महामंडळ विशेष बसेस चालवते. मात्र, या बसेसना मध्य प्रदेश सरकारकडून परवानगी मिळण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्य शासनाने मध्य प्रदेश सरकारकडे शिष्टाई करून परवानगी प्रक्रिया सुलभ करावी.
या प्रश्नावर उत्तर देताना परिवहन राज्यमंत्री यांनी सांगितले की, नागद्वार पचमढी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या बसेसच्या परवानगीसाठी मध्य प्रदेश सरकारकडे दरवर्षी पत्रव्यवहार केला जातो. यंदाही लवकरात लवकर परवानगी मिळावी यासाठी शिष्टमंडळ पाठवून चर्चा करण्यात येईल आणि भाविकांना अडचण होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल.