*लक्षवेधीच्या माध्यमातून आमदार अभिजित वंजारी यांची मागणी*
मुंबई/नागपूर :* राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये घरकर वसुलीची पद्धत पारदर्शक व संगणकीकृत करण्याची मागणी आमदार अभिजित वंजारी यांनी आज (ता. 7) लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडताना आमदार वंजारी यांनी स्पष्टपणे नमूद केले की, घरकर वसुलीची सद्यस्थिती अनेक ठिकाणी अनियमित असून, नागरिकांना याद्वारे अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच मनमानी दरवाढ, चुकीचे मूल्यांकन आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने येत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. राज्यातील अनेक नगरपालिका व नगरपरिषदांमध्ये घरकराची रचना, वसुली पद्धती आणि पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पारदर्शक नाही. ही प्रक्रिया एकसंध व संगणकीकृत केल्यास नागरिकांवर होणारा अन्याय कमी होईल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा महसूलही वाढेल, असे वंजारी यांनी ठासून सांगितले. त्यांनी शासनाकडे घरकरासाठी एक समान धोरण व प्रोटोकॉल तयार करण्याची मागणी केली, जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना एकसमान व न्याय्य सेवा मिळू शकेल.