आमदार अभिजित वंजारी यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई/नागपूर :* विधिमंडळ अधिवेशनात आमदार अभिजित वंजारी यांनी सामाजिक न्याय विभागातील अपंग व्यक्तींशी संबंधित स्वतंत्र विभाग निर्मितीचा मुद्दा उपस्थित करत त्यातील पदभरती न झाल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून आ. वंजारी यांनी शासनाचे लक्ष वेधले. स्वतंत्र विभाग तयार करूनही आजपर्यंत त्या विभागातील आवश्यक अधिकारी-कर्मचारी पदे भरली गेलेली नाहीत, हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. आमदार वंजारी म्हणाले, अपंग विभाग स्वतंत्र केल्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी त्या विभागाचे कार्य प्रभावीपणे सुरू राहण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची पदभरती तातडीने व्हायला हवी होती. सध्या या विभागातील अनेक पदे रिक्त आहेत, त्यामुळे लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष बाब म्हणून जी पदे भरणार आहेत, त्यात समांतर आरक्षण अंमलात आणणार आहात का, हा प्रश्न यावेळी उपस्थित केला. याचबरोबर आ. वंजारी यांनी वेगवेगळ्या विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया रखडल्याबाबतही मुद्दा उपस्थित केला. राज्य शासनाच्या विविध खात्यांतील अनेक कर्मचाऱ्यांची पदोन्नती अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. ही प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणेआवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.