आमदार अभिजित वंजारी यांची शासनाकडे मागणी
मुंबई/नागपूर | प्रतिनिधी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी नागपूर MIDC परिसरातील नागरी व वाणिज्यिक आरक्षित भूखंडांवर सुरु असलेल्या रासायनिक कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करत सरकारकडे थेट कारवाईची मागणी केली. मुंबई येथे सुरू असलेल्या 2025 च्या पावसाळी अधिवेशनात नागपूर MIDC परिसरातील प्रदूषणाचा प्रश्न विधानसभेत गाजला. आमदार अभिजित वंजारी म्हणाले, “हा प्रश्न केवळ ठाण्यापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील MIDC क्षेत्रात, विशेषतः नागपूरमध्ये, ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राच्या पलिकडे रेसिडेन्शियल आणि वाणिज्यिक जागांमध्ये सुद्धा काही केमिकल इंडस्ट्री सुरू आहेत, त्या ठिकाणी गंभीर प्रदूषण निर्माण होत आहे. नागपूर MIDC परिसरातील दोन मोठ्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. ज्या भूखंडांचा वापर रहिवासी किंवा व्यावसायिक प्रयोजनासाठी होणे अपेक्षित आहे, तिथे केमिकल इंडस्ट्री सुरू आहे. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.” “या बाबतची संपूर्ण माहिती मी संबंधित मंत्री महोदयांना देत आहे. त्या संदर्भात तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे,” असेही वंजारी यांनी स्पष्ट केले.