Skip to content

TCS आणि ABPS कंपन्यांवर कारवाई होणार का?

 MHT-CET परीक्षेतील 21 प्रश्नांतील चुका आणि पेपरफुटी प्रकरणांवर आमदार अभिजित वंजारींचा सवाल

मुंबई | प्रतिनिधी 2025 च्या पावसाळी अधिवेशनात MHT-CET परीक्षेतील चुकीच्या प्रश्नांबाबत आणि राज्यातील सरळसेवा भरतीतील पेपरफुटी प्रकरणांवर आमदार अभिजित वंजारी यांनी सरकारला कठोर शब्दांत जाब विचारला. त्यांनी TCS आणि ABPS या परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. वंजारी म्हणाले, “राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची समजली जाणारी एमएचटी-सीईटी परीक्षा 27 सत्रांमध्ये झाली. यामध्ये 6 लाख 77 हजार 560 विद्यार्थी बसले होते. 27 एप्रिल 2025 रोजी पीसीएम गटाची परीक्षा तीन भाषांमध्ये (इंग्रजी, मराठी, उर्दू) घेण्यात आली होती, ज्या सत्रात 27,837 विद्यार्थी उपस्थित होते. मात्र, त्या पेपरमध्ये तब्बल 21 प्रश्नांमध्ये चुका होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.” सरकारकडून उत्तर देताना, संबंधित मंत्र्यांनी या चुका ग्रामीण प्रश्नपत्रिकांमध्ये आणि मराठी-उर्दू माध्यमांमध्ये झाल्याचे मान्य केले. परंतु इंग्रजी प्रश्नपत्रिकेतील कंटेंट योग्य होता, असा दावा त्यांनी केला. तथापि, वंजारी यांनी हे उत्तर अपुरं व असमाधानकारक असल्याचे सांगत अधिक तपशीलवार स्पष्टीकरण मागितले. तसेच त्यांनी राज्यातील इतर सरळसेवा भरती परीक्षांमध्ये TCS व ABPS या कंपन्यांना दिलेल्या कंत्राटांबाबतही प्रश्न उपस्थित केला. “या कंपन्यांच्या माध्यमातून झालेल्या परीक्षा अनेकदा वादग्रस्त ठरल्या असून काही ठिकाणी पेपरफुटी, गैरव्यवहार घडले आणि गुन्हेही दाखल झाले. मग अशा कंपन्यांना सरकारने अजूनही का काळ्या यादीत टाकलेले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एमएचटी-सीईटी परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांविषयी असंतोष व्यक्त केला होता. त्यानंतर घेण्यात आलेल्या फेरपरीक्षेमुळे काही विद्यार्थ्यांची मानसिक तयारीही डगमगली. या साऱ्या घडामोडींमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, जबाबदारी निश्चित करून संबंधित कंपन्यांवर व व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी वंजारी यांनी अधिवेशनात मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *