Skip to content

विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा मुद्दा अधिवेशनात गाजला

 आमदार अभिजित वंजारी यांनी केली निधी व भरतीसंदर्भात मागणी

मुंबई | प्रतिनिधी 2025 च्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात विदर्भातील अपूर्ण सिंचन प्रकल्प आणि जलसंपदाशी संबंधित प्रश्न उपस्थित करत आमदार अभिजित वंजारी यांनी शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. आमदार अभिजित वंजारी म्हणाले, विदर्भातील शेती आणि उत्पन्न व्यवसायासाठी महत्त्वाचे असलेले अनेक सिंचन प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहेत. निधीअभावी किंवा वनविभागाच्या परवानग्यांअभावी हे प्रकल्प रखडले आहेत. विशेष म्हणजे, यापैकी काही प्रकल्पांना पूर्वी प्रशासकीय मान्यता मिळाली होती, परंतु ती मान्यता आता रद्द करण्यात आली आहे, असा प्रकार पहिल्यांदाच घडत आहे जर हे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत, तर शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर होतील. विशेषतः, 12 कोटी 60 लाख रुपयांचा निधी अद्याप वितरित झालेला नाही. शासन तो निधी कधी वितरित करणार? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, वंजारी यांनी पाटबंधारे महामंडळातील रिक्त पदांवर भरतीचा मुद्दाही उपस्थित केला. महामंडळात एकूण 11,039 पदे मंजूर आहेत, परंतु यातील केवळ 53% पदेच भरलेली आहेत. कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता, अभियांत्रिकी सहाय्यक अशा अनेक तांत्रिक पदे रिक्त आहेत. हे पदे भरल्या शिवाय प्रकल्पांना गती मिळणार नाही. शासन या पदांची भरती तत्काळ करणार का? असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *