आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला प्रश्न
मुंबई : शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती करण्याच्या प्रक्रियेबाबत आमदार अभिजित वंजारी यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान लक्ष वेधले.
आमदार वंजारी यांनी सभागृहात स्पष्ट केले की, शालेय शिक्षण विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिल्यानंतर शासनाच्या धोरणानुसार शुल्क परताव्याची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्षात ही प्रक्रिया अतिशय ढिसाळ आहे. अनेक कुटुंबांचे शुल्क परताव्याचे प्रस्ताव अनेक महिने प्रलंबित ठेवले जात आहेत.
यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी निर्माण होत असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे आ. वंजारी यांनी अधिवेशनात ठामपणे सांगितले.
त्यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागाकडून या संदर्भात योग्य त्या सूचना तातडीने देऊन थकित शुल्क परतावा प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्याची मागणी केली.
सभापतींनी यावर शासनाकडून उत्तर मागवले असून, लवकरच या प्रकरणात निर्णय घेतला जाईल, सांगितले.