Skip to content

कौशल्य विकास विभागातील निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार; लोकायुक्तांच्या आदेशानंतरही कारवाई नाही

आमदार अभिजित वंजारी यांचा विधान परिषदेत आरोप

 

मुंबई/नागपूर : राज्याच्या कौशल्य विकास विभागात यंत्रसामुग्री व मशीन खरेदीसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असून, याबाबत लोकायुक्तांनी स्पष्ट आदेश देऊनही अद्याप संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हा गंभीर मुद्दा आमदार अभिजित वंजारी यांनी आज विधान परिषदेत उपस्थित केला.

आ. वंजारी म्हणाले, कौशल्य विकास विभागाच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा ठपका लोकायुक्तांनी आपल्या आदेशात स्पष्ट केला आहे. मात्र, आश्चर्य म्हणजे या प्रकरणात दोषींवर कारवाई न करता प्रकरण दडपले जात आहे. सरकारने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

सभागृहात झालेल्या चर्चेत वंजारी यांनी आणखी स्पष्ट केले की, या निविदा प्रक्रियेमुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाला आहे. कौशल्य विकासाच्या नावाखाली तरुणांना प्रशिक्षण देण्याऐवजी निविदा प्रक्रियेतच मोठे आर्थिक घोटाळे झालेत. यामुळे शासनाची विश्वासार्हता धोक्यात आली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सभागृहातील विरोधकांनीही वंजारी यांच्या मुद्द्याला पाठिंबा दर्शवत सरकारवर निशाणा साधला. अध्यक्षांनी यावर त्वरित उत्तर देण्याच्या सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *