व्यवस्थापकीय संचालकांशी केली चर्चा : समस्या गांभीर्याने घेण्याच्या केल्या सूचना
नागपूर :-महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षणविषयक योजनांचा लाभ घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या विविध अडचणींवर आमदार अभिजित वंजारी यांनी आज (दि. २८) महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या समस्या लेखी स्वरूपात मांडून त्यांचे निवेदनही या वेळी सुपूर्द करण्यात आले.
या चर्चेदरम्यान विद्यार्थ्यांनी अधिछात्रवृत्ती वेळेवर न मिळाल्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणी मांडल्या. अधिछात्रवृत्ती वितरणातील विलंबामुळे विद्यार्थ्यांना गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून शुल्क, पुस्तके, वसतिगृह खर्च भागवण्यासाठी कर्ज काढावे लागते किंवा पालकांवर अतिरिक्त भार येतो. शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत मदत न मिळाल्यास अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणच धोक्यात येऊ शकते, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
तसेच, हॉस्टेल भाडे भत्ता (HRA) संदर्भातही विद्यार्थ्यांनी तक्रारी मांडल्या. महाज्योतीच्या वसतिगृहात जागा अपुरी असल्यामुळे अनेकांना खासगी हॉस्टेलमध्ये रहावे लागते, मात्र त्यांना HRA मिळण्यात अडथळे येतात. हॉस्टेलमध्ये राहूनही संपूर्ण रक्कम परत मिळत नाही, उलट नियमांच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक ओझे पडते. शिक्षणासाठी दूरवरून शहरात यावे लागते आणि त्यासाठी वसतिगृह ही गरज आहे; मग HRA देण्यात होणारा विलंब अन्यायकारक असल्याचे मत विद्यार्थ्यांनी मांडले.
शुल्कवसुली संदर्भातील समस्या देखील गंभीर असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. प्रवेशानंतर त्वरित शुल्क जमा करण्याची सक्ती केली जाते, मात्र महाज्योतीकडून मिळणारी मदत वेळेवर पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांना खिशातून पैसे भरावे लागतात. काही प्रकरणांमध्ये अधिछात्रवृत्तीची रक्कम वर्षभरानंतरच मिळते, ज्यामुळे पालकांवर मोठा आर्थिक ताण पडतो आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होण्याची भीती निर्माण होते.
या आणि अन्य सर्व समस्यांवर महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. तांत्रिक बाबींवर तातडीने सुधारणा करण्याचे आणि शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत वेळेवर पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले की, ओबीसी विद्यार्थ्यांना योजनांचा पूर्ण आणि वेळेवर लाभ मिळणे ही आमची जबाबदारी आहे. मी या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करणार असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य होईपर्यंत हा प्रयत्न सुरू राहील, असेही ते म्हणाले.
आ. अभिजित वंजारी आणि महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांच्यादरम्यान झालेल्या चर्चेदरम्यान विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते