न्यायवैद्यक प्रयोगशाळांमध्ये मनुष्यबळ वाढवावे
– आमदार अभिजीत वंजारी यांची विधान परिषदेत मागणी
मुंबई : राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांची क्षमता वाढवून तांत्रिक मनुष्यबळाची भरती तातडीने करावी, अशी मागणी आमदार अभिजीत वंजारी यांनी विधान परिषद सभागृहात उपस्थित केली. (#AbhijitWanjarri #VidhanParishad #ForensicScience)
सभागृहात बोलताना वंजारी यांनी सांगितले की, राज्यातील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळांनी आतापर्यंत सुमारे चार लाख प्रकरणांचा निवाडा केलेला आहे. फेब्रुवारी 2026 पासून नागपूर येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत नवीन कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र सध्या या विभागाकडे केवळ 110 प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे वाढत्या प्रकरणांचा ताण सांभाळणे कठीण होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
दिवसेंदिवस गुन्ह्यांचे स्वरूप अधिक तांत्रिक आणि गुंतागुंतीचे होत असल्याने न्यायवैद्यक प्रयोगशाळांकडे मोठ्या प्रमाणात प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व न्यायवैद्यक प्रयोगशाळांची वार्षिक चाचणी क्षमता दोन लाखांवरून 22 लाखांपर्यंत वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच प्रत्येक उपविभागीय पोलीस ठाण्यात मोबाईल फॉरेन्सिक युनिट उपलब्ध करून देणे, घटनास्थळी पुरावे संकलनावर अधिक भर देणे आणि नवीन फौजदारी कायद्याशी सुसंगत तपास प्रक्रिया राबविणे गरजेचे असल्याचेही वंजारी यांनी नमूद केले.
ही सर्व यंत्रणा प्रभावीपणे राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे सांगत राज्याच्या गृह विभागाने किमान 220 तांत्रिक पदांची भरती मंजूर करावी, तसेच नागपूर न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत तातडीने मनुष्यबळाची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
#AbhijitWanjarri #VidhanParishad #ForensicScience #Nagpur #MaharashtraPolice #CrimeInvestigation
….
