Skip to content

जगाची गरज ओळखून स्वत:ला प्रेझेंट करा

आमदार अभिजीत वंजारी; सकाळ व गोविंदराव वंजारी फाउंडेशनकडून गुणवंतांचे कौतुक

भंडारा :-  जगात सर्वच ठिकाणी चांगल्या माणसांची गरज आहे. त्यामुळे स्वत:चे ॲनालीसीस करून करिअरची निवड करावी. त्याचसोबत जगाची गरज ओळखून स्वत:ला प्रेझेंट करण्याचे कसबही आपल्याला आत्मसात करता आले तर, कुठेही हमखास यश मिळते, असे प्रतिपादन आमदार अभिजीत वंजारी यांनी केले.

‘सकाळ’ आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वेध भविष्याचा’ कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून म्हणून बोलत होतेे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार अभिजीत वंजारी होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. पाणिनी तेलंग होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘सकाळ’चे विदर्भ आवृत्तीचे निवासी संपादक प्रमोद काळबांडे, सरव्यवस्थापक बंेजामीन रॉक, सहायक सरव्यवस्थापक (जाहीरात) सुधीर तापस, मुख्य व्यवस्थापक (वितरण) विजय वरफडे, ज. मु. पटेल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रदीप मेश्राम उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात विविध शाळा व महाविद्यालयातून दहावी, बारावी आणि महाविद्यालयीन परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांसह सामाजिक व क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणारे मान्यवर, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाकरिता भंडारा शहर व विविध तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी नोंदणीकरिता गर्दी केली होती.

यावेळी उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर, खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पदक व प्रमापत्र देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. याशिवाय विविध क्षेत्रातील यशवंत आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमासाठी नोंदणी करणाऱ्या गुणवंतांना प्रत्येकी एक बॉटल भेट स्वरूपात देण्यात आली.

या कार्यक्रमात आलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मान्यवरांनी सकाळ व गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या ‘वेध भविष्याचा’ कार्यक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. हेमंत सोनारे यांनी केले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे संचालन रुपेश मेश्राम यांनी केले. या कार्यक्रमात ‘सकाळ’चे वरिष्ठ जाहीरात व्यवस्थापक तेजस काळमेघ, व्यवस्थापक मकरंद राव, रुपेश मेश्राम, अमोल कोड्डे, यिनचे सहायक व्यवस्थापक क्रिष्णा शर्मा, अमित रोशनखेडे, सतीश बघेले, रुपशे भंडारे, शीतल नंदनवार, दीपक फुलबांधे, नितीन देशमुख, शैलेश उरकुडे, चेतक हत्तीमारे, पंकज सपाटे आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशनचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

जुन्या मित्रमैत्रिणींची भेट

दहावी व बाराव्या वर्गाचा निकाल लागल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे जुने मित्र दिसेनासे झाले होते. मात्र, गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आज एकत्र आले. त्यामुळे जुन्या मित्रमैत्रिणींना पाहाताच त्यांना अानंद झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी आल्यामुळे त्यांना जुने वर्गमित्र मिळाल्याचे समाधान मिळाले. यावेळी त्यांच्यामध्ये नवीन अभ्यासक्रम व नवीन कॉलेजमधील गमती जमतीची चर्चा चांगलीच रंगली होती.

फाउंडेशनचे स्पर्धा परीक्षेला बळ :- आमदार वंजारी

विदर्भातील ग्रामीण भागातही गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांना संधी उपलब्ध करून दिली तर, ते सुद्धा स्वत:च्या प्रगतीसोबत गाव आणि परिसराचा विकास करून शकतात. त्याकरिता गोविंदराव वंजारी फाउंडेशनद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजित केले जाते. यात ५० पेक्षा अधिक ख्यातनम कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच ३५० ग्रंथालयांत स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेकरिता युवक-युवतींना बळ मिळाले आहे. कोणत्या क्षेत्रात करिअर निवडावे? हा विद्यार्थी व पालकांसमोर यक्ष प्रश्‍न आहे. या कार्यक्रमात नोंदणी करणारे सर्व विद्यार्थ्यांना कधीही प्रा. पाणिनी तेलंग यांची अपॉइंटमेंट घेण्याची वेळ आली तर, त्याची फी गोविंदराव वंजारी फाउंडेशनकडून दिली जाईल, अशी घोषणा आमदार वंजारी यांनी केली. तसेच त्यांनी आपल्या करिअरची निवड करण्याकरिता मोबाईलच्या माध्यमातून सायको मेट्रीक टेस्ट, ॲप्टीट्यूड टेस्ट देऊन आपल्या भविष्याच्या वाटा निवडा, असा सल्ला दिला.

प्लॅनिंगमध्ये लुडबुड सहन करू नका :-  तेलंग

या कार्यक्रमात प्रमुख वक्ते प्रा. पाणिनी तेलंग यांनी आपल्या करिअरची निवड करताना कोणत्याही नातेवाईकाची लुडबुड सहन करू नका. माणूस मेल्यावरही तो ज्ञानाच्या रुपात जिवंत राहिल, असे क्षेत्र निवडा असा सल्ला विद्यार्थी व युवकांना दिला. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात ८०० कॉलेजमधून एका अभ्यासक्रमाचे वर्षाकाठी दोन ते अडीच लाख इंजिअर्स तयार होतात. त्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळे कसे? हे जोपर्यंत ठरवता येणार नाही. तोपर्यंत आपली किंमत वाढणार नाही. आपल्याला इतरांपेक्षा अधिक परिणामकारक पद्धतीने काम करता यायला हवे. आपली गरज समाजात निर्माण करता यायला हवी. एखाद्या विषयाची परीक्षा पास करायला फक्त ३५ टक्के गुण लागतात. पण, त्याच विषयात इंटरेस्ट निर्माण करायचा असल्यास १०० टक्के परिणाम दाखवावे लागतात. त्यामुळे परीक्षेत मिळालेले गुणांवरून दिशा ठरवणे, योग ठरणार नाही. त्यामुळे संबंधित विषयातील समस्यांचे समाधान, शिकण्याचे कौशल्य, संवादकौशल्य यावरही प्रभूत्व मिळवणे आवश्‍यक आहे. त्यानंतर देश, समाज, निसर्ग, कुटुंब यांचाही फायदा कसा होईल? याचा विचार करूनच करिअरची निवड करा, असा सल्ला श्री. तेलंग यांनी उपस्थितांना दिला.

लाेककल्याणातून सकारात्मक परिणाम :- प्रमोद काळबांडे

सकाळ माध्यम समुहाची भूमिका स्पष्ट करताना निवासी संपादक प्रमोद काळबांडे यांनी सकाळद्वारे सुरू असलेल्या लोककल्याणकारी कार्याची माहिती देऊन त्यामुळे समाजात सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे सांगितले. सकाळद्वारे राज्यातील ८०० गावांमध्ये नाला खोलीकरण व जलस्रोतांचे बळकटीकरण करण्यात आले आहे. सकाळ माध्यम समुहाचे साम टिव्ही, ॲग्रोवन, यीन आणि तनिष्का या व्यासपीठातून विद्यार्थी, महिला सक्षमीकरण, शेतकरी विकासयावर भर दिला आहे. आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी आणि तरुणाईला करिअर आणि भविष्याची दिशा मिळत आहे. आज ‘सकाळ’च्या संकल्पनेला गोविंदराव वंजारी फाउंडेशन व आ. वंजारी यांचे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे आता हा विदर्भात एक उपक्रमच झाला आहे, असे श्री. काळबांडे यांनी व्यक्त केले.

दिव्यांग खेळाडूंचा सन्मान

वेध भविष्याचा कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात यश संपादन करणारी ज्योती गडेरीया आणि योगेश्‍वर घाटबांधे यांचे मान्यवरांनी कौतुक केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात यश मिळवण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. ज्योती गडेरिया हिने अपघातात आलेल्या दिव्यांगामुळे निराश न हाेता पॅरा सायकलींगमधून आशियायी व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशाचे नाव चमकले आहे. तसेच लाखनी तालुक्यातील दिव्यांग खेळाडू योगेश्‍वर घाटबांधे याने आपल्या परिसरातील इतर दिव्यांगांना पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत उतरण्याचा मार्ग दाखवून अनेक गुणवंत खेळाडू घडविले आहेत. याबद्दल त्यांचा या कार्यक्रमा सत्कार करण्यात आला.

अंशूल भेंडारकर लॅपटॉप विजेता

वेध भविष्याचा या कार्यक्रमाकरिता नोंदणी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सोबतच एक कुपन देण्यात आले होते. सकाळी ११ वाजतापासून नोंदणीकरिता विद्यार्थी व विद्यार्थिनींची गर्दी झाली होती. यावेळी लकी ड्रा मधून एका विजेत्याला लॅपटॉप मिळणार असल्याने विद्यार्थी वर्गाचा उत्साह वाढला होता. गुणवंताचा सत्कार करण्यात आल्यावर सर्व कुपनमधून आमदार अभिजीव वंजारी यांच्या हस्ते एका विजेत्याची निवड करण्यात आली. यात साकोली येथील अंशूल भेंडारकर हा लॅपटॉपचा विजेता ठरता. त्याला नियमाप्रमाणे ३० टक्के गिफ्ट टॅक्स भरावा लागणार होता. मात्र, आमदार अभिजीव वंजारी यांनी गोविंदराव वंजारी फाउंडेशनकडून हा कर भरला जाईल, अशी घोषणा केली.

जिद्द, सातत्य कायम ठेवा

या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात जनजागृतीचे कार्य केल्याबद्दल इंजिनिअर रुपचंद रामटेके यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थी व युवकांना जिद्द व सातत्य कायम ठेवून परिश्रमाची तयारी ठेवा. तेव्हा तुम्हाला यश नक्की मिळेल, असे मार्गदर्शन केले.

काव्यात्मक प्रेरणा

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मान्यवरांनी शेर, म्हणीचा वापर करून उपस्थितांना प्रेरणा दिली. यात निवासी संपादक श्री. काळबांडे यांनी ‘ बेहत्तर से बेहत्तर तलाश करो, मिल जाये नदी तो समुंदर तलाश करो. टुट जाता है शिशा पत्थर की चोट से, टुट जाये पत्थ ऐसा शिशा तलाश करो’ असे सांगितले. तसेच डॉ. सोनारे यांनी
‘युंही पंखोसे कुछ नही होता, हौसले मे जान होनी चाहिये’ असा मंत्र दिला. त्याचप्रमाणे प्रा. पाणिनी यांनी ‘सक्सेस नेव्हर लीड टू हॅपीनेस बट, हॅपीनेस ऑलवेज लिड टू सक्सेस’ असे सांगून उपस्थितांना आनंदातून यश शोधण्याचा मार्ग दाखवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *