पावसाळी अधिवेशनात आमदार अभिजित वंजारी यांचा सवाल
मुंबई | प्रतिनिधी मुंबई येथे सुरू असलेल्या 2025 च्या पावसाळी अधिवेशनात मदत व पुनर्वसन विभागांतर्गत काही जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यांबाबत फौजदारी कारवाई का केली जात नाही, असा थेट सवाल काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी सभागृहात उपस्थित केला. वंजारी म्हणाले, “भारतीय दंड संहिता (Indian Penal Code), जी आता ‘भारतीय न्याय संहिता’ म्हणून कार्यरत आहे, त्यामध्ये स्पष्ट तरतुदी आहेत. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आल्यास त्याच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल केला जावा, असे स्पष्ट आहे. मात्र मदत व पुनर्वसन विभागाच्या कामकाजात काही ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा गैरवापर व शासनाच्या निधीचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले असूनही, आजवर कोणतीही फौजदारी कारवाई झालेली नाही. ते पुढे म्हणाले, या संदर्भात मागील प्रश्नोत्तरातही भाजप आमदारांनी याच मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे आता तरी सरकारने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी. मी सरकारला विचारतो आहे की, अशा प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे तत्काळ दाखल करण्याचे आदेश आपण देणार का? आणि ते आता सभागृहात जाहीर करणार का? वंजारी यांच्या या मुद्द्यावर सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.