आमदार अभिजित वंजारी यांचा विधानपरिषदेत प्रश्न
*मुंबई/नागपूर :* राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज प्रश्नोत्तराच्या तासामध्ये घरगुती वीज दरवाढीच्या मुद्द्यावर आमदार अभिजित वंजारी यांनी सरकारला जाब विचारला. राज्यभरात घरगुती वीज दरामध्ये झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कुटुंबीयांवर आर्थिक भार वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरवाढीमागील कारणे स्पष्ट करत नागरिकांना दिलासा देणारे आश्वासन दिले.
आमदार वंजारी म्हणाले की, महावितरणकडून दर महिन्याला वीज दर वाढवले जात आहेत. इतर राज्यांकडून वीज खरेदी करताना दर वाढले की मूळ किंमतीत वाढ केली जाते आणि केवळ दोन टक्के कपात केल्याचे दाखवले जाते. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याबाबत राज्य सरकारने ठोस धोरण जाहीर करावे.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील वीज दर हे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या निर्देशांनुसार ठरवले जातात. केंद्र सरकारने इंधन समायोजन दर (एफएसी) पूर्वी दर सहा महिन्यांनी लागू केला जात होता, तो दरमहा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दर काही प्रमाणात बदलले आहेत, परंतु या प्रक्रियेत पारदर्शकता असून महावितरणने एफएसी दरात जून महिन्यात दोन टक्क्यांची कपात केली आहे.
फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले की, महावितरणची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी वीज दरवाढ आवश्यक आहे, मात्र राज्य सरकार सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी योजना राबवत आहे. विशेषतः 300 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी अनुदानाचा विचार केला जात आहे. त्यासाठी लवकरच धोरण जाहीर करण्यात येईल.पुढील काही काळात सर्व राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा वीज दर हा कमी असेल, असेही ते म्हणाले.
आमदार वंजारी यांनी यावर समाधान व्यक्त करत राज्य सरकारने हे धोरण लवकरात लवकर लागू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.